भोर तालुक्यात राजकीय खळबळ : एका तरुण नेत्याच्या 'राष्ट्रवादी'त एंट्रीची जोरदार चर्चा; शेकडो कार्यकर्त्यांसह होणार प्रवेश

Maharashtra varta

 


कापूरहोळ | प्रतिनिधी| :-टी. पवार.

भोर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर तापताना स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गावागावांत नेते, पदाधिकारी व इच्छुक यांचे भेटीगाठी, कार्यकर्त्यांचे मोर्चेबांधणीचे दौरे, विविध सामाजिक-राजकीय उपक्रमांची रेलचेल यामुळे राजकीय वातावरण तापलेले दिसते.

या पार्श्वभूमीवर, भोर  तालुक्यातील एका प्रभावशाली व कडव्या कार्यकर्त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील भोर तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित गोटात चिंतेचे वातावरण होणार असल्याचे  दिसते.

या युवा कार्यकर्त्याने गेल्या काही वर्षांत समाजकार्य, वाढदिवस, सामाजिक  उपक्रम ,तरुणांमध्ये नेतृत्व विकास आणि गाव विकासाच्या कामात ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्याच्या राजकीय वाटचालीकडे नव्या पिढीचे विशेष लक्ष लागलेले आहे. त्याच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भोर तालुक्यात सुरू आहे.


पक्षांतर्गत हालचाली, गुप्त बैठकांची साखळी, आणि वरिष्ठ नेत्यांशी संपर्कामुळे येत्या काही दिवसांत हा प्रवेश अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. हा पक्षप्रवेश फक्त एक सामील होणे नसून, येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे राजकीय समीकरण ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया आहे.


युवा नेतृत्वाचे पक्षप्रवेशासंबंधी निर्णय, त्याचे गाव-गावातील प्रभाव, आणि इतर इच्छुकांच्या राजकीय योजना या सगळ्याच गोष्टींनी भोर तालुक्यातील निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे.

To Top