पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांची वेळू शाळेला भेट : शैक्षणिक गुणवत्ता व परिसर व्यवस्थापनाची प्रशंसा

Maharashtra varta

 



पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांची वेळू शाळेला भेट : शैक्षणिक गुणवत्ता व परिसर व्यवस्थापनाची प्रशंसा

वेळू, ता. भोर : पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आज दुपारी वेळू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अचानक भेट दिली. जवळपास एक तासाच्या या दौऱ्यात त्यांनी शाळेचा भौतिक व शैक्षणिक दर्जा, पोषण आहार व्यवस्थापन, तसेच शालेय उपक्रमांची सखोल पाहणी केली.

शाळेच्या स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध परिसराचे त्यांनी विशेष कौतुक केले. किचन शेडची पाहणी करताना त्यांनी पोषण आहारातील मेन्यू तसेच अन्नधान्याचे प्रमाण बारकाईने तपासले. त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर समाधान व्यक्त केले.

इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गांना भेट देत शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन, लेखन आणि गणितीय क्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षकांनी घेत असलेल्या उपक्रमशील अध्यापनपद्धतींची त्यांनी स्तुती केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी समाधानकारक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान त्यांनी शालेय अभिप्राय नोंदवहीत ‘उत्तम कामकाज’ असा शेरा लिहून शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले. सर्व शिक्षकांशी सविस्तर संवाद साधून शाळेतील उपक्रम, समस्या आणि सीएसआर फंडाचा वापर यावर मार्गदर्शन केले. याच वेळी लेझीम व नृत्यस्पर्धांतील जिल्हास्तरावरील यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सूर्यवंशी, शिक्षक रूपाली मुजुमले, सुषमा थोरात, संगीता सणस, प्रीती घुले, जास्मिन पठान, संगीता घोडे, अश्विनी गुरव, मनीषा निकम, प्रतिभा वाघमारे आणि शरद खांडेकर आदी उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे शिक्षकांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून, यापुढेही शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



To Top