भोर (ता. भोर) –पत्रकार विठ्ठल पवार ।
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भोरमधील मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला. राजवाडा चौकात आयोजित निषेध सभेत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या हल्ल्यात निष्पाप भारतीय व विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असून, समाजाने एकजूट होऊन अशा अतिरेक्यांचा विरोध करावा, असे स्पष्ट मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या निषेध आंदोलनानंतर भोर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने या अमानवी हल्ल्यामागील दोषींना तत्काळ शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पर्यटकांचे धर्म ओळखून त्यांच्यावर हल्ला करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार असून, समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचाही सरकारने शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निषेध सभेदरम्यान पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या सर्व निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, व्यापारी, समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेच्या आणि सहिष्णुतेच्या संदेशाने ओतप्रोत असलेले हे आंदोलन समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरले.
"दहशतवादाचा कुठल्याही स्वरूपात निषेध व्हायलाच हवा, कारण मानवतेपुढे कोणताही धर्म किंवा सीमा मोठी नाही," असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.