राजगड –(पत्रकार विठ्ठल पवार ")
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील दोन अत्यंत महत्त्वाचे किल्ले – तोरणा आणि राजगड – हे आजही इतिहासाचे अमूल्य साक्षीदार म्हणून उभे आहेत. या गडांवर भव्य आणि प्रेरणादायी शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हे स्मारक उभारले गेल्यास युवापिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल, इतिहासाचे स्मरण जपले जाईल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास या शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.या प्रमुख मागणीसाठी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदासबापू चोरघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार (वेल्हे) आणि वेल्हे पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, गडांचे ऐतिहासिक वैभव आणि पर्यावरण अबाधित ठेवत स्मारके उभारली जातील. कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक किंवा निसर्गात्मक ऱ्हास होणार नाही, याची हमी देण्यात आली आहे.
या वेळी रोहिदासबापू चोरघे , नागरिक शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष सचिन ढोरे, माजी सरपंच शरद पिलाने, मनसे तालुकाप्रमुख दिगंबर चोरघे, गोपाळनाना इंगुळकर, एकनाथ वालगुडे, शैलेश वालगुडे, सागर मोझर, कुंदन गंगावणे, चंद्रकांत मोरे, खंडू गायकवाड, अनंता उफाळे, भगवान खुटवड, विशाल वालगुडे, दत्ता पानसरे, नाना शिर्के आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहिदासबापू चोरघे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही संविधानिक मार्गाने परवानगी मागत आहोत. मात्र, काही शिवभक्तांनी भावनेच्या भरात विनापरवाना पुतळा बसवल्याने प्रशासनाने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.” स्मारक बांधकामास लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशीही त्यांची विनंती आहे.
या मागणीला आता विविध संघटनांचा पाठिंबा लाभत असून, एकत्र येऊन आंदोलनाचीही तयारी सुरू झाली आहे. शासनाकडेही या मागणीसाठी साकडे घालण्यात आले असून, स्मारक उभारणीसाठी आवश्यक निधी आणि अधिकृत परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न वेगात सुरू आहेत.
शिवप्रेमींचा विश्वास आहे की, या स्मारकामुळे तोरणा आणि राजगड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होईल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल. शासनाने या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि लवकरच कृतीशील निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिवप्रेमींच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.