(कामथडी):-विठ्ठल पवार सर.
कामथडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. या विशेष प्रसंगी शाळेच्या शिक्षिका रिबेका मनेकर-पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप केले आणि ख्रिश्चन धर्मातील सणांचे महत्त्व, प्रार्थना पद्धती आणि सण साजरा करण्यामागील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन उलगडून सांगितला.
मनेकर-पवार मॅडम यांनी ख्रिसमसचा मुख्य गाभा असलेल्या सांताक्लॉजची कल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या व समर्पक शब्दांत समजावली. त्यांनी सांताक्लॉजचे प्रेम, दानशीलता आणि आनंद पसरवण्याचे प्रतीक विद्यार्थ्यांना पटवून दिले. या माध्यमातून मुलांच्या मनात सहकार्य, दानशीलता आणि सकारात्मक विचारांच्या बीजांची रुजवात केली गेली.
शाळेतील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी क्रिसमस निमित्त रंगवलेली पेंटिंग्स, सजवलेले क्रिसमस ट्री आणि इतर कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेने आणि कलाकुसरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने मनेकर-पवार मॅडम यांना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मॅडमचे मन:पूर्वक आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या.
ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, मूल्ये आणि सृजनशीलतेचा जागर करणारा ठरला. त्यामुळे हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी कायम लक्षात राहणारा ठरेल, यात शंका नाही.