केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी मुळनियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्याची शिक्षण आयुक्तांकडे मागणी पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे यांची माहिती.

Maharashtra varta

 केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी मुळनियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्याची शिक्षण आयुक्तांकडे मागणी

पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे यांची माहिती


पुणे (मुख्य संपादक )

जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे भरताना प्राथमिक शिक्षकांचा मुळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून सेवा जेष्ठता यादी तयार करून शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांचेकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर त्याचा परिणाम होत आहे.परंतु २०१४ पासून राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्यात न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने या पदाचे अतिरिक्त पदभार प्राथमिक पदवीधर शिक्षकांकडे देण्यात आले आहेत.त्यामुळे याचा गुणवत्ता वाढीवर परिणाम होऊन पदोन्नती प्राप्त शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहत आहेत.संघटनेची वेळोवेळी मागणी व पाठपुराव्यामुळे शासनाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ५० टक्के स्पर्धा परिक्षेने व ५० टक्के पदोन्नतीने ही पदे भरण्यात यावीत असा आदेश काढला त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात आली आहे.परंतु ११ जून २०२४ व १३ जुलै २०२४ रोजी शिक्षण संचालक यांनी पत्र काढून केंद्रप्रमुखांची पदोन्नती करताना सेवेचा मुळ नियुक्ती दिनांक ग्राह्य न धरता पदवीधर शिक्षकाची नियुक्ती झालेला दिनांक ग्राह्य धरण्यात यावा असे जिल्हा परिषदेला कळविल्यामुळे काही जिल्हा परिषदेमध्ये या पत्रानुसार केंद्रप्रमुख यांच्या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत तर काही जिल्हा परिषदेने मुळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून केंद्रप्रमुख पदोन्नती केल्या आहेत. परंतु अनेक जिल्ह्या परिषदामध्ये अद्यापही या संभ्रमामुळे केंद्रप्रमुख यांची पदोन्नती करण्यात आलेली नाही.शिक्षण संचालक यांच्या पत्रामुळे सेवा जेष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे.असा अन्याय होऊ नये यासाठी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे  व मुख्याध्यापक विजय कारभळ यांनी भेट घेऊन केंद्रप्रमुखांची पदोन्नती करताना प्राथमिक शिक्षकांची मुळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून सेवा जेष्ठता यादी तयार करून शासन निर्णय २७ सप्टेंबर २०२३ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत अशी मागणी केली आहे.

To Top