शिक्षकांचा मोर्चा, नेमका कशासाठी.
पुणे( प्रतिनिधी):●-संपादक न्यूज वार्ता●
खाली दिलेले पत्र /बातमी आपापल्या वर्गातील, शाळेतील, गावातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत, व्यवस्थापन समिती, सन्मा. लोकप्रतिनिधीं पर्यंत WhatsApp च्या माध्यमातून तातडीने प्रत्येक बांधवांनी पोहोचवावेत. _ज्यामुळे आपले आंदोलन कशासाठी हे प्रत्येकाला समजेल.. गैरसमज निर्माण होणार नाहीत..._आम्ही शिक्षक बुधवारी सुट्टी घेऊन मोर्चा काढत आहोत- तुमच्या शिक्षणासाठी..!
प्रिय विद्यार्थी मित्रांनो-
बुधवारी दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही शिक्षक एकाच वेळी रजा घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढत आहोत. एक दिवसाची सुट्टी घेऊनंही मोर्चा का काढत अहो. ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या आई-बाबांना, पालकांना सुद्धा सांगा...
१) सरकारने जिल्हा परिषद । नगर परिषदेच्या कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. ज्या कमी पटाच्या शाळेत दोनच शिक्षक आहेत त्यातला एक शिक्षक काढून घेऊन तेथे तात्पुरता व्यक्ती नियुक्त करायचा आणि पुढे त्यालाही काढून टाकून एकच शिक्षक ठेवायचा. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे. शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी असणार नाही आणि विद्यार्थी नाही म्हणून पुढे अशा शाळा बंद होणार आहे. गोर-गरिबांच्या मुलांना दुसऱ्या गावी शिकायला जावे लागेल. तसेच पाच वर्गाला एक-दोन शिक्षक, ६ वी ते ७/८ ला एक-दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होऊ शकत नाही.
२) शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी कित्येक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. जेथे गणवेश मिळाले ते मुलांच्या मापाचे नाही, त्याचा कापड चांगला नाही. काही ठिकाणी पुस्तकही मिळाले नाहीत. शाळांमध्ये पुरेसे डेस्क-बेंच, आसन पट्टया नाही. अनेक शाळेला चांगल्या इमारती सुद्धा नाही.
३) शालेय पोषण आहारात दररोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगतात परंतु त्यासाठी आवश्यक ते अनुदान नाही. शाळांमध्ये लागणाऱ्या सोई-सुविधांसाठी पाहिजे तेवढे अनुदान नाही.
४) दररोज चांगल्या प्रकारे शिकवायची इच्छा असून सुद्धा रोजच कागदपत्रे तयार करणे, ऑनलाइन मिटींगा, ऑनलाईन माहिती, वेगवेगळे उपक्रम, शिक्षण सोडून इतर कामांमुळे आम्ही शिक्षक तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी पुरेसा वेळ सुद्धा देऊ शकत नाही. अशा सर्व अडचणी सोडवा आणि मुलांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ व आवश्यक सुविधा द्या. गोर-गरिबांच्या शाळा बंद करू नका. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवू नका... यासाठी आम्ही सरकारकडे कित्येक वर्षांपासून विनंती करीत आहोत. निवेदने देत आहोत. परंतु सरकार ऐकत नसल्याने आम्ही सर्व शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी (दि.२५ सप्टेंबर २०२४) आमच्या हक्काची रजा घेऊन मोर्चा काढणार आहोत. त्या मोर्चात तुम्हा विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी जात असल्याने बुधवारी शाळेत येऊ शकणार नाही. या दिवशी तुमचे होणारे शिक्षणाचे नुकसान आम्ही भरून काढू. मात्र आम्ही सुट्टी काढून मोर्चा का काढत आहो ते तुम्ही समजून घ्यावे आणि तुमच्या पालकांनाही सांगावे. शिक्षकांना शिकवायला वेळ मिळावा, पुरेसे शिक्षक मिळावे आणि चांगले शिक्षण व्हावे यासाठीच आमचा मोर्चा व २५ सप्टेंबर २०२४ रोजी घेतलेली रजा आहे. सदैव तुमचे शिक्षक-शिक्षिका,
शिक्षकांना शिकवू द्या...