शाळेतील मुलींसाठी रचना संस्थेद्वारे किशोरी वयातील समस्यांवर मार्गदर्शन सत्र●
नसरापूर( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार .
कांबरे गावच्या जि. प.प्राथमिक शाळेतील मुलींसाठी रचना संस्थेद्वारे किशोरी वयातील समस्यांवर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.नसरापूर केंद्राच्या केंद्रप्रमुख मंगल मालुसरे यांनी स्वतः कार्यक्रमात उपस्थित राहून या उपक्रमाच्या उपयुक्ततेचा आढावा घेतला.त्यावेळी अभिप्राय व्यक्त करताना श्रीम.मालुसरे म्हणाल्या, "सध्याच्या काळात घडणाऱ्या बालकांवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता मुलींना सक्षम व सज्ञान करणे आवश्यक आहे.
नुकत्याच झालेल्या शिक्षण परिषदांमध्ये झालेल्या चर्चेनुसार हा उपक्रम केंद्रातील सर्व वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे".या उपक्रमाद्वारे 'वयात येताना होणारे बदल,चांगला-वाईट स्पर्श,किशोरी आरोग्य,ऍनिमिया व मुलींसाठी पोषक आहाराचे महत्व तसेच स्वच्छ्ता यावर या सत्रात माहिती देण्यात येत आहे.
रचना संस्थेच्या माधुरी उंबरकर व शुभांगी घाडगे यांनी या सत्राद्वारे मुलींना मार्गदर्शन केले.तसेच मयुरी पवळे व जयश्री वाल्हेकर यांनी मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम आणि वाढत्या वयातील आहार या बाबत मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक संजय वाल्हेकर यांनी स्वागत केले. श्री.विकास खुटवड यांनी आभार मानले.या कार्यक्रमात बाळकृष्ण यादव,सुरेश चव्हाण व उत्तम भोसले आदी शिक्षकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.