कृष्णाभाऊ, पुणेकरांचा आवाज व्हा:-विजयराव कुंभार.
धनकवडी(बालाजी नगर) येथे आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न .
पुणे (प्रतिनिधी) :-
धनकवडी (बालाजी नगर )तथा पुणे शहरात 'कृष्णा गायकवाड' यांनी गेली 20 वर्ष हुन अधिक काळ समाजसेवा करत, सामाजिक बांधिलकी जपली आहे.कृष्णा गायकवाड व सहकाऱ्यांनी आम आदमी पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आणि पुणेकरांच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी "कृष्णा भाऊ तुम्ही पुणेकरांचा आवाज व्हा" असे आवाहन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा पुणे शहराचे आम आदमी पक्षाचे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले.
आम आदमी पक्ष - जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजर्षी शाहू बँकेच्या वर धनकवडी , बालाजीनगर येथे संपन्न झाले. त्यावेळेस कुंभार बोलत होते, यावेळेस भारतीय जनसंघाचे राज्य सरचिटणीस प्रभाकर कोंढाळकर म्हणाले की, गोरगरिबांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे शहरात कृष्णा भाऊ गायकवाड यांनी आंदोलने मोर्चे करत प्रभावीपणे काम केलेले आहे.आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या कामाचा आदर्श घेऊन पुणेकरांना अभिमान वाटेल असे काम तुमच्या हातून घडावे आणि तुमचे आम आदमी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय हे लोकांच्या समस्या अडीअडचणी समजावून व सोडवण्यासाठी चे केंद्रबिंदू व्हावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष कृष्णा भाऊ गायकवाड म्हणाले की, देशाला भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक सरकार द्यायचे असेल, तर त्याचा पिंड समाजकारणाचा आहे. फक्त आणि फक्त अशाच लोकांनी राजकारणात यावे ,असे माझे मत असून मी पूर्णवेळ समाजकार्यासाठी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून स्वतःला जनतेसाठी अर्पण करत आहे.पुणे शहरात सामाजिक काम व उपक्रम आणखी वेगाने राबविण्याचा माझा मानस आहे. जनहिताला व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून गोरगरीब, याबाबत प्रभावीपणे काम आम आदमी पक्षाच्या माध्यमातून करणार आहे . त्यासाठी पुणेकरांनी मला अशीच साथ द्यावी, उत्तरोत्तर माझ्यावर प्रेम करावे.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंदराव सकट व सहकारी व ह-भ-प रमेश महाराज मते, विष्णु महाराज शिंदे, धनकवडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नथुराम सणस, बाळासाहेब धेंडे, येरवडा- वडगाव शेरीचे संजय आठवले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत नथुराम सणस यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार खडकवासला मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष कृष्णा गायकवाड मानले.
यावेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
