सिंहगड, राजगड, रोहिडा आणि रायरेश्वराचा आराखडा बनवून विकास करावा:-खा. सुप्रिया सुळे यांची मागणी.
कापूरहोळ , दि. १ (प्रतिनिधी) -
शिवनेरी आणि रायगड या किल्ल्यांच्या धर्तीवर सिंहगड, राजगड, रोहीडा आणि रायरेश्वर किल्ल्यांचा विकास आराखडा बनविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आहे. येथील किल्ले सिंहगड, राजगड, रोहिडा, आणि रायरेश्वर या किल्ल्यांना वर्षभरात लाखो शिवप्रेमी तसेच पर्यटक भेट देत असतात. यापैकी रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तर राजगडावर तब्बल २५ वर्षे स्वराज्याची राजधानी होती. येथूनच महाराजांनी सर्वाधिक काळ स्वराज्याचा कारभार पाहिला. इतकेच नाही, तर स्वराज्याचा विस्तारही केला. मोघलांच्या ताब्यातील गड घेताना सरदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर आपल्या प्राणांची आहुती दिली.
अशा देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सिंहगड राजगडासह, रोहीडा व रायरेश्वर या किल्ल्यांचाही ऐतिहासिक वारसा जपायला हवा. नव्या पिढीसाठी त्यांचे संवर्धन व्हायला हवे. त्यामुळे पर्यावरणाचा योग्य समतोल राखून वन विभागामार्फत या किल्ल्याचा विकास व्हावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासाठीच शिवनेरी व रायगड या किल्ल्यांच्या धर्तीवर सिंहगड, राजगड, रोहीडा व रायरेश्वर किल्ल्यांचा विकास आराखडा लवकरात लवकर बनविण्यात यावा, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

