साळुंगण एक स्मरणदायी सहल प्रवास:-पक्षीनिरीक्षक गणपत पांगारे.
कापूरहोळ (प्रतिनिधी)
(पक्षीनिरीक्षक गणपत पांगारे यांचा सहल प्रवास लेख आहे)
वर्षभर साळुंगणला जाण्याचा बेत आखत होतो पण जाणं काही होत नव्हतं. दस-याच्या मुहूर्तावर साळुंगणला जाण्याचा योग जुळुन आला. साळुंगणला जाण्यासाठी बरोबर दत्ता पांगारे (सर), त्यांचा छोटा मुलगा स्वराज, अमित बाठे, केतन बाठे, समीर पांगारे आणि देऊळजाई देवीचे पुजारी गणेश कुलकर्णी होते.
मागील आठवड्यातच दत्ता पांगारे साळुंगणला जाउन आले होते. साळुंगण हे त्यांच्या जिवलग मित्र दुरकर सरांचे गाव तसेच आमचे ग्रामदैवत देऊळजाई देवीचे मुख्य ठाणं. साळुंगण येथील देवीचं ठाणं हे आत जंगलात ओढ्याकाठी असल्याचं दुरकर सरांकडुन समजले होते.आम्ही सर्वजण पहिल्यांदाच जात असल्यानं मंदिरात जाण्याची उत्सुकता लागली होती.
साळुंगण भोरच्या पुर्वेला वरंध घाटानजिक पस्तीस किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत, घनदाट जंगलात वीस एक घरं असलेलं एक छोटंस गाव.
भोर-पसुरे-पांगारी मार्गे कोकणात जाणा-या रस्त्यानं वेडी वाकडी वळणं घेत घेत आम्ही साळुंगण गावात पोहचलो. गावातील मंदिराजवळ गाडी पार्क करुन मंदिरातील देवीचं सर्वांनी दर्शन घेतलं. दस-याचा दिवस असल्याने मंदिरात पुजा-यांची देवीचे मुखवटे मांडुन पुजेची लगभग चालु होती.
मंदिरातच आम्हाला दुरकर सरांचे मोठे बंधु विलास दुरकर भेटले.त्यांच्याकडुन देवीच्या ठाण्याकडे जाण्याच्या मार्गाची माहीती करुन घेतली.
गावातील देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजुने डोंगर उतारावरुन खाली खोल दरीमधे जंगलातील पायवाटेने तासाभराची पायपीट करात, वाटेतील वाहते ओहळ, धबधबे पहात आम्ही देऊळजाई देवीचे मुख्य ठाणं असलेल्या ओढ्याकाठच्या मंदिरामधे पोहचलो. दस-याचा दिवस असल्याने सकाळीच कोणीतरी देवीची पुजा करुन, समई लावुन गेलं होतं.
मंदिरामधे निरव शांतता होती. शेजारील वाहणा-या ओढ्यातील पाण्याचा मंजुळ आवाज कानाला गोड वाटत होता. सर्वांनी ओढ्याच्या (अतिशय स्वच्छ) पाण्यात हात-पाय धुवुन मंदिरातील देवीचे दर्शन घेतले. पुजारी गणेश कुलकर्णी यांनी देवीची साडी, नारळ, ओटी भरुन पुजा केली.
मंदिराबाहेरील ओढ्याकाठी, झाडाच्या सावलीत पक्षांची गाणी ऐकत बरोबर आणलेले डबे संपविले. आणि पुढील वर्षी परत या ठिकाणी येण्याच्या निश्चयाने समाधानाने परतलो.



