(वेल्हे : चोरीच्या गुन्ह्यातील जेरबंद आरोपींसह कार्यक्षम वेल्हे पोलीस पथक.)
::::::;:;;:;;;;;:;;;;;:;;:;:;:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
वेल्हे (प्रतिनिधी) :
( महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोदवडी (ता.वेल्हे) येथे शुक्रवारी (दि.३) झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात १ लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच तासांत वेल्हे पोलिसांनी अत्यंत शिताफीने सुपरफास्ट कामगिरी करत गुन्ह्यातील विठ्ठल बजरंग शेंडकर (रा. अस्कवडी ), दिगंबर लक्ष्मण ननवरे (रा.अस्कवडी) व वसंत सोपान राजिवडे (रा. दामगुडा आसनी) या तीनही आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३) शिखर सुर्यप्रकाश गुप्ता (रा.विश्रांतवाडी, पुणे) व त्यांचे चार मित्र कोदवडी (ता.वेल्हे) येथील मंत्रा रिसॉर्टला फिरण्यासाठी त्यांच्या इरटिगा गाडीने आले होते. गाडीचालक अमोल लोंढे यांनी शिखर गुप्ता व त्यांच्या मित्रांना रिसॉर्टमध्ये सोडून मार्गासनी येथे गेले. जाताना गाडीमध्ये शिखर गुप्ता यांची एक काळी बॕग व त्या बॕगेत एक लॕपटॉप, एक चार्जर, एक मोबाईल चार्जर, जे.बी.एल. कंपनीचा साऊंड, एक जर्कीन व एक लॕपटॉप माऊस असे १ लाख २३ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य होते. मार्गासनीहून मंत्रा रिसॉर्टला परतत असताना अस्कवडी गावाच्या हद्दीतील लोखंडी पुलाच्या कॉर्नरजवळ समोरून अचानक गाडी आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात लोंढे यांचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. अपघातग्रस्त इरटिगा गाडी ट्रॕक्टरच्या साहाय्याने बाहेर काढताना मदतीसाठी जमलेल्या जमावातील कोणीतरी अज्ञात इसमाने साहित्यासह काळी बॕग चोरून नेली. शिखर गुप्ता यांनी याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.६) सकाळी १० वाजता तक्रार दाखल केली. गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या तपास पथकाने अत्यंत जलद गतीने तपास करून दुपारी २ वाजता तीनही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, हवालदार बांदल, गुंडगे, पोलीस नाईक औदुंबर अडवाल, पोलीस काँन्स्टेबल अभय बर्गे, होमगार्ड गायकवाड यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक औदुंबर अडवाल हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------
