कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही ,मात्र कांदा दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होणार असेल तर नागरिकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले तर त्याविरोधात कोणीही उभे राहत नाही ,मात्र शेतमालाचे भाव वाढले की चर्चेचा विषय होतो असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार बच्चूभाऊ कडू यांनी कांदा पूजन केले. त्यावेळेस ते बोलत होते, यावेळी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख ,उपसचिव सतीश कोंडे ,कामगार संघटनेचे सचिव संतोष नांगरे, दि पूना मर्चंट चेंबर चे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल ,प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य समन्वयक तथा संपर्कप्रमुख गौरव नारायण जाधव, नयन पुजारी, उमेश महाडिक, संतोष साठे ,नितीन पगार, प्रकाश वरे तसेच विविध प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या वेळेस आमदार बच्चू भाऊ कडू म्हणाले की दोन महिन्यानंतर बाजारात नवीन कांदा आणि आयात केलेला कांदाही बाजारात येईल मात्र तोपर्यंत देश थांबायला तयार नाही. कांद्याचे भाव कमी झाले कि सरकार कांदा निर्यात करण्यास पुढे येत नाही. मात्र भाववाढ झाली की आयात करण्यात येते. वाढत्या भावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे त्यातून चार आत्महत्या जरी थांबल्या, तरी शेतकऱ्याचा निश्चितच फायदा होईल.
