कापूरहोळ (वार्ताहर) : वांगणीवाडी(ता.वेल्हे) येथील ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन स्थापन केलेल्या एज्युकेशनल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट केला.
जीर्ण असलेले शाळेचे प्रवेशद्वार, निरस वाटणाऱ्या शाळेच्या वर्गखोल्यांचे चित्र लोकसहभागातून बदलण्याचे ध्येय उराशी बाळगून गावातील तरुणांनी आकर्षक व दर्जेदार प्रवेशद्वार, शालेय इमारतीचे रंगकाम करून सर्व वर्ग बोलक्या केल्या. विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी शाळेला संरक्षक भिंत तयार करून दिली. गळक्या छतांचे वॉटर प्रूफींग करण्यात आले. बदलत्या शिक्षणपध्दतीनुसार आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी ई-लर्निंग संच उपलब्ध करून दिले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळेची निर्मिती केली. वाचनाची गोडी लागावी व वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी समृद्ध ग्रंथालय तयार करण्यात आले. तसेच येथील ग्रामस्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर विशेष लक्ष असल्याचे शाळेतील शिक्षक विकास गायकवाड यांनी सांगितले.
त्याचबरोबर शाळेने आयोजित केलेल्या 'कृतज्ञता सोहळा' या कार्यक्रमात ग्रामस्थांनी शाळेसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी ५० हजार रुपयांची रोख रक्कम मुख्याध्यापक सतीश कोंडे यांच्याकडे सुपूर्त केला.
यासाठी निवृत्त न्यायाधीश रघुनाथ बंडू चोरघे, आकाश वाडघरे, ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन वाडघरे, उपसरपंच अंकुश चोरघे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल बिऱ्हामणे, जितेंद्र वाडघरे, संतोष चोरघे, अनिल वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रदीप चोरघे, रोहिदास चोरघे, भागुजी चोरघे, धनंजय सावंत, बबन वाडघरे, शिवाजी बिऱ्हामणे, दशरथ चोरघे, सुरेश बिऱ्हामणे, सचिन चोरघे, श्रीरंग गोंडेकर, रामदास चोरघे, श्रीकांत चोरघे, श्रीरंग लिम्हण, विशाल वाल्हेकर, सुधीर खुटवड, गणेश चोरघे, दत्ता चोरघे, विशाल चोरघे, अविनाश बिऱ्हामणे, निलेश चोरघे, अक्षय चोरघे, मंगेश चोरघे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सतीश कोंडे यांनी केले. सूत्रसंचालन विकास गायकवाड यांनी केले. महादेव राऊत यांनी आभार मानले.
असे एकवटले तरूण : पुण्यात नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतर झालेले गावातील तरूण गावाचा विकास लोकसहभागातूनच करण्याच्या उद्देशाने एकत्र आले. हे तरुण दरमहा काही ठराविक रक्कम स्वेच्छेने जमा करतात. ही जमा झालेली रक्कम ट्रस्टमध्ये वर्ग केली जाते. त्याच रकमेतून गावातील पाणलोट बंधारे, शाळा, वृक्षसंवर्धनासारखी महत्त्वाची कामे केली जातात.

