मोठया पदावर अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आसावरी, व सायलीला "ध्रुव" ची अनोखी मदत.
भोर (प्रतिनिधी)
दुग्धव्यवसायाच्या निमित्ताने टिटेघर -भोर प्रवासात म्हाकोशी गाव लागते, राजीव केळकर या रस्त्याने सततच्या प्रवासात, भोर, रायरेश्वर रस्त्यावर म्हाकोशी गावालगत दोन मुली रस्त्यावर बिस्कीट, ब्रिसलरी पाणी बाटली, कुरकुरे, चॉकलेट इत्यादी वस्तू घेऊन एका छोट्या टेबलावर झाडझुडपाच्या बाजूला छोटस दुकान (नावाला)थाटून बसायच्या.
राजीव केळकर हे सलग तीन महिने पाहत होते. एके दिवशी खुप पाऊस आला व त्यांचं सर्व साहित्य भिजून गेले. राजीव केळकर गावाकडे जात असताना मुलींचे भिजलेल्या साहित्याची भराभर व वस्तूंचे नुकसान झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता राजीव केळकर यांना स्पष्ट जाणवत होती. राजीव केळकर यांनी हे सर्व दुरून पाहून ते थोडया अस्वस्थ मनाने त्यांच्या गावाकडे निघून गेले.
घरी गेल्यावर रात्री झोपताना त्या दोन मुलींची अस्वस्थ करून सोडणारी केळकरांनी पाहिलेली परिस्थिती. त्यांना नीट झोप घेऊन देत नव्हती. राजीव केळकर यांच्या मनात प्रश्नाचं काहूर माजल होत. त्या दोन मुली रस्त्यावर ऊन, वारा, पाऊस यामध्ये का बसतात? त्यांच्या मदतीला अजून कोणी का नसते?
इतक्या कमी साहित्यात त्यांना किती फायदा होत असेल? आज त्यांचे नक्की किती नुकसान झाले असेल? असा विचार करत राजीव केळकर दुसऱ्या दिवसाची वाट पहात झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे त्या दोन मुली ज्या ठिकाणी दुकान थाटून बसतात तिथे नीट नेटके असलॆले साहित्य घेऊन एकटी मुलगी बसली होती. राजीव केळकर यांची दुधाची गाडी रस्त्याच्या कडेला थांबून केळकर जवळ गेले. त्या मुलीचे आदल्या दिवशी घडलेल्या नुकसानाबद्दल विचारणा केली. व त्यांची कुटुंबाची माहिती घेतली. वडील गुलाब तुपे , आई रोहिणी तुपे दोघेही शेतात राबराब राबतात तिघी बहिणी रोहिणी (विवाहित )आसावरी, व सायली तिघी शाळेत अत्यन्त हुशार म्हणून ओळखल्या जातात.
शेतातील नापीक पणा यामुळे नुसत्या पीक पाण्याच्या उत्पनावर आमचा कौटुंबिक खर्च भागत नाही, आणि मग आमच्या दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाचे तर दूरची गोष्ट आहे. आसावरी सांगू लागली. मला या वर्षी 12 वी ला 85% तर सायलीला 10 वी ला 92.77%मार्क आहेत. आम्हाला दोघीनाही मोठया पदावर अधिकारी व्हायचंय. मग आई, वडिलांना खारीच्या वाट्याने मदत म्हणुन आम्ही येथे रस्त्याने येणाऱ्या -जाणाऱ्या वाटसरूंना विशेषतः रायरेश्वराला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना गरजेच्या किराणा वस्तू योग्य किमतीत उपलब्ध करून देतो. व त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून आम्ही आमचे शिक्षण करून आम्ही आमच्या आई, वडिलांचा आर्थिक भार कमी करणार आहोत. आज सायली कालच्या झालेल्या नुकसानीमुळे नाराज आहे !म्हणून ती आज घरातच आहे. (अगदी बाजूलाच शेड वजा घर आहे) आधीच आम्ही तिघी आम्हाला भाऊ नाही मग आम्हीच त्यांची मुलं म्हणून मदत केली व त्यांचा थोडासा भार हलका केला तर बिघडल कुठं?
या आसावरीच्या प्रश्नार्थक उत्तरांन केळकर यांना तिच्यातील जिद्द, ध्येय, चिकाटी व आई वडिलांबद्दल आदर या गोष्टीमुळे केळकरांनी तिला सॅल्यूटच केला. तिची आर्थिक परस्थिती व छोटया बहिणीला घेऊन पुढील आयुष्याच्या स्वप्नांसाठी चाललेली धडपड राजीव केळकर यांना जाणवत होती. या त्यांच्या प्रयत्नांना "ध्रुव प्रतिष्ठान" काहीतरी हातभार लावेलेच ,असे ठरवून केळकर हे भोरच्या दिशेने रवाना झाले.
पुढे काही दिवसातच 30 ते 35 हजार किमतीची उत्तम प्रतीची शटर असलेली टपरी केळकर यांनी खरेदी केली. 5 हजार रु. किमतीचे दुकानातील साहित्य उपलब्ध करून दिले. व शनिवार दि. 05/12/2020 रोजी या सावित्रीमाईच्या लेकीला मोठया थाटात दुकान थाटून दिल.
दुकान तर झालं, पण बदल्यात उत्तम शैक्षणिक गुणवत्ता आम्ही दाखवून देऊ असे आश्वासन ही त्यांच्या कडून घेतले. आपण गरीब म्हणून शैक्षणिक मदतसुद्धा केली असती पण गरिबीचं नाहीशी व्हावी याउद्देशाने केलेली मदत कधीही योग्यच आहे.असं केळकरांना वाटलं. आज आसावरी, सायली झाल्या, पण अश्या कित्येक आसावरी आपल्या स्वप्नांसाठी संघर्ष करतायत, आज "ध्रुव"ने मदत केली. प्रत्येक ठिकाणी ध्रुव पोहचणार नाही किंवा ध्रुव पाशी जादूची कांडी देखील नाही, ध्रुवची मदत हा एक माध्यम म्हणुन प्रयत्न आहे.
पण समाजाने अश्या आसावरी शोधल्या, तर कित्येक आसावरीचं स्वप्न पूर्ण होईल, त्यात तीळमात्र शंका नाही.
आजचा मदतीचा हात ही समाज प्रधान मानवतावाद यातील हक्क आणि कर्तव्य या भावनेतूनच आहे. आणि आसावरी व सायली यांच्या अधिकार पदावर जाण्याच्या स्वप्नांना त्यांच्यातील ध्येयाने पेटलेल्या अग्नीला मारलेली थोडीशी फुंकर आहे.